नवी दिल्ली,
Class 10 result stands at 96.78 percent केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) प्रथमच राबविलेल्या इयत्ता दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या निकालावर सकारात्मक परिणाम झाल्याचे समोर आले आहे. 'बेस्ट ऑफ टू' पद्धतीमुळे केवळ उत्तीर्णतेची टक्केवारी वाढली नसून, एका परीक्षेवरच भविष्य अवलंबून असल्याची विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासही मदत झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना पहिल्या प्रयत्नातील चुका सुधारून अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली.एका अहवालानुसार, मुख्य परीक्षा आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचा एकूण उत्तीर्णतेचा टक्का ९६.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुख्य परीक्षेनंतर हा आकडा सुमारे ९३.७० टक्के होता. दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकालात समावेश झाल्याने आणि अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये सुधारणा झाल्याने उत्तीर्णतेच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
अहवालानुसार, दुसऱ्या बोर्ड परीक्षेला बसलेल्या सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांमध्ये सुधारणा केली. पहिल्या परीक्षेतील निकालाबाबत समाधानी नसलेले किंवा वैयक्तिक कारणांमुळे शिक्षक व पालकांच्या सल्ल्याने पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या संधीचा मोठा फायदा झाला.राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही प्रणाली विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरत असल्याचे शिक्षण विभागातील तज्ज्ञांचे मत आहे. एका परीक्षेवर संपूर्ण निकाल अवलंबून न राहता दुसऱ्या प्रयत्नाची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना अधिक वेळ घेऊन तयारी करता येते. तसेच सर्व विषयांऐवजी आवश्यक विषयांवर लक्ष केंद्रित करता येत असल्याने परीक्षेचा मानसिक ताणही कमी होतो.
सीबीएसईने २०२६ पासून इयत्ता दहावीसाठी 'बेस्ट ऑफ टू' प्रणाली लागू केली आहे. या पद्धतीनुसार विद्यार्थी दोन्ही बोर्ड परीक्षा देत असल्यास प्रत्येक विषयातील दोन्ही परीक्षांमधील गुणांची तुलना केली जाते आणि ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले असतील तेच अंतिम गुणपत्रिकेत नोंदवले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला गणित विषयात पहिल्या परीक्षेत ७४ आणि दुसऱ्या परीक्षेत ८८ गुण मिळाल्यास अंतिम निकालात ८८ गुण ग्राह्य धरले जातील. मात्र, दुसऱ्या परीक्षेत ६८ गुण मिळाल्यास पहिल्या परीक्षेतील ७४ गुणच कायम राहतील. हा नियम प्रत्येक विषयासाठी स्वतंत्रपणे लागू होत असल्याने एका विषयातील गुणसुधारणेचा इतर विषयांच्या गुणांवर कोणताही परिणाम होत नाही.