स्टार्ट अप,
नामदेव भदे,
earthenware-business : मातीच्या भांड्यात केलेल्या स्वयंपाकाची चव अप्रतिम लागते. आजच्या काळात अनेक जण स्टीलच्या आणि नॉनस्टिकच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करतात. पण मातीच्या भांड्यात बनवलेले काही पारंपरिक पदार्थ आहेत जे त्यामध्येच केल्यानंतर चविष्ट लागतात. हीच बाब लक्षात घेऊन दीनदयाल नगर येथील रहिवासी अश्विनी अभिजित ऋषी यांनी आयटी कंपनीतील नोकरी सोडून तयार मातीची भांडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटी कंपनीत नोकरी केली. मात्र, त्यात समाधान न मिळाल्याने तयार मातीची भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आजच्या घडीला या व्यवसायातून त्यांनी २५ कुटुंबांना रोजगार दिला आहे. ग्राहकांना हव्या असलेल्या आकारातील मातीचे भांडे त्या तयार करून देतात. स्वदेशीला प्राधान्य देत मातीच्या भांड्यांचे आरोग्यासाठी महत्त्व विशद करीत त्या ग्राहकांना अशी भांडी उपलब्ध करून देतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान येथील कुंभारांकडून त्या ऑडरप्रमाणे विविध प्रकारची, आकाराची भांडी तयार करवून घेतात.
मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याची माहिती ग्राहकांना दिल्यानंतर अनेक ग्राहक मातीच्या भांड्यांची मागणी करतात. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या पदार्थाची चव खूपच छान असते. यात तयार केलेले अन्नपदार्थ खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बऱ्याच गृहिणी मातीच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात करतात. मातीच्या भांड्यात तयार केलेल्या अन्नपदार्थांत अनेक पोषक घटक आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर असल्याची माहिती अश्विनी ऋषी यांनी दिली.
मातीच्या भांड्यात पाणी भरण्यापासून ते भाजी, बिर्याणी असे पदार्थ बनविले जातात. कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय उद्योग बंद झाले असताना घरबसल्या काही नवीन व्यवसाय करण्याच्या हेतूने अश्विनी ऋषी यांनी मातीची भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला अल्पावधीतच त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. लाल व काळया मातीची भांडी विक्रीसाठी उपलब्ध असून यात हंडी, कढई, डिनर सेट, चहाचे भांडे, ग्लास सेट, कपसेट, थंड पाण्याचे जार आदींना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. साधारणत: १०० ते १ हजार रुपयापर्यंतची मातीची भांडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मातीच्या भांड्यात जवळपास १८ प्रकारचे खनिज पदार्थ असल्यामुळे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.
मुख्यत: सोशल मीडियाचा उपयोग करीत मातीच्या भांड्यांची विक्री केली जाते, अशी माहिती अश्विनी ऋषी यांनी दिली. स्वदेशी आणि पर्यावरणपूरक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचा विचार मनात रुजल्यामुळे संपूर्ण स्वदेशीला प्राधान्य देत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उद्योजकता विकास प्रशिक्षणातून माझ्यातील उद्योजिका जागृत झाली. एमसीईडी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जाचा लाभ मिळाला. या आर्थिक पाठबळामुळे माझ्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. तसेच, अमृत संस्थेमार्फत कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाल्याने आर्थिक भार कमी झाला आणि व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा करण्यास मदत झाली, अशी माहिती अश्विनी यांनी दिली.