चंदीगड,
female student dies of electric shock पंजाब विद्यापीठात मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागल्याने २८ वर्षीय पीएचडी विद्यार्थिनी ज्योती हिचा मृत्यू झाला. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मुलींच्या वसतिगृहातून वर्गाकडे जात असताना ज्योतीला विजेचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. परिसरातील विद्यार्थ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात संतापाची लाट उसळली. विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयाबाहेर निदर्शने करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कुलगुरू घटनास्थळी न आल्याचा आरोप करत संतप्त विद्यार्थ्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. अपघातासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत विद्यार्थ्यांनी कारवाईची मागणी केली.
दरम्यान, मंगळवारी पंजाबसह हरियाणाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक शहरांतील सखल भाग जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी नागरिकांना पाणी साचणे आणि वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.
भारतीय हवामान विभागाने (IMD) २८ ते ३० जुलैदरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तर आणि पूर्व भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयएमडीच्या नोंदीनुसार, पंजाबमधील शहीद भगत सिंग नगर येथे १५.२ मिमी, बठिंडा येथे १४.५ मिमी, लुधियाना येथे १३.६ मिमी, पठाणकोट येथे ९.८ मिमी, होशियारपूर येथे ४ मिमी, जालंधर येथे ३.५ मिमी आणि मोहाली येथे १.५ मिमी पावसाची नोंद झाली. चंदीगडमध्ये १.७ मिमी पाऊस झाला. हरियाणातील अंबाला येथे ०.१ मिमी, भिवानी येथे ४.४ मिमी, कर्नाल येथे ३ मिमी, महेंद्रगड येथे १ मिमी आणि सोनीपत येथे २.५ मिमी पावसाची नोंद झाली.