म्हशीच्या गोठ्यात खून, कारच्या डिक्कीत मृतदेह!

कोल्हापूरमध्ये माजी महिला सरपंचाची हत्या

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
कोल्हापूर,
Former female Sarpanch murdered in Kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत असल्याच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा न्यारे या संशयित आरोपीच्या घराशेजारी राहत होत्या. दोघांमध्ये वैयक्तिक संबंध असल्याची माहिती समोर आली असून, सुरेखा न्यारे या आरोपीकडे लग्नाची मागणी करत असल्याचा दावा तपासात पुढे आला आहे. या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
 
 
Former female Sarpanch murdered in Kolhapur
 
रविवारी (२६ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील 'लिडोंरीचा वाड्या' परिसरातील म्हशीच्या गोठ्यात आरोपीने सुरेखा न्यारे यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह स्वतःच्या चारचाकी वाहनातून भिवंडीकडे नेण्यात येत होता.भिवंडी परिसरात पोलिसांना वाहनाबाबत संशय आल्याने त्यांनी ते अडवून तपासणी केली. वाहनाची झडती घेतल्यानंतर डिक्कीत मृतदेह आढळून आला. त्यानंतर चालकाची चौकशी करण्यात आली असता हत्येचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संदेश सर्जेराव मोरे (वय २७, रा. भिवंडी) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सुरेखा न्यारे या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेमागील नेमके कारण, दोघांतील संबंध आणि इतर सर्व बाबींचा शाहूवाडी पोलीस सखोल तपास करत आहेत.