चंद्रपूर,
grand-rally-in-chandrapur : गोवंशाचे रक्षण, पूर्ण सुरक्षा आणि राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यासाठी ‘गो सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकार्यांमार्फत गो तस्करांवर कठोर कारवाईसाठी आणि गो-संरक्षणासाठी केंद्रीय कायदा तयार करावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सोमवारी सकाळी 9.30 वाजता गांधी चौकात गोरक्षणासाठी जैन साध्वी डॉ. विजयाश्री महाराजसाब यांनी प्रवचन दिले. त्यानंतर गांधी चौकातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत मनिष महाराज, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर संगीता खांडेकर, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहेलोत यांच्यासह शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली.
देशातील 5,100 तहसील कार्यालयांतून सव्वापाच कोटींहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षर्यांसह एक प्रार्थनापत्र केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संपूर्ण देशातील गोसेवकांनी गो सन्मान आवाहन अभियानाद्वारे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधले आहे. निवेदनात गोवंशाचे रक्षण आणि स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आठ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. राज्यघटनेच्या कलम 48 च्या चौकटीत सुधारणा करून संपूर्ण देशासाठी एकच ‘केंद्रीय गो-सेवा आणि संरक्षण कायदा’ लागू करावा. सर्व कसाईखाने बंद करून स्वतंत्र गो-पालन मंत्रालय स्थापन करावे. देशी गोवंशाला संवैधानिकरीत्या राष्ट्रमाता किंवा राष्ट्रीय आराध्या म्हणून घोषित करून विशेष संरक्षण द्यावे. गो तस्करी व गो-हत्येला अजामीनपात्र गुन्हा ठरवून जन्मठेप आणि दोषींची मालमत्ता जप्त करण्याचा नियम करावा.
शेतीमध्ये सेंद्रिय खतांच्या वापराला प्रोत्साहन द्यावे. शाळांमधील माध्यान्ह भोजन आणि मंदिरांतील प्रसादात केवळ देशी गाईचे दूध व तूप बंधनकारक करावे. प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘नंदीशाळा’ आणि जिल्हा स्तरावर ‘गो-अभयारण्य’ उभारावे. महामार्गावर अपघातग्रस्त गोवंशासाठी दर 50 ते 100 किमीवर ‘गो-वाहिन्या व ट्रॉमा सेंटर सुरू करावेत. चराईच्या (गोचर) जमिनींवरील अतिक्रमणे हटवून ‘गोचर विकास मंडळ’ स्थापन करावे, गोवंश हा केवळ श्रद्धेचा विषय नसून, आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि पर्यावरणाचा मुख्य आधार आहे असे मत निवेदकांद्वारे व्यक्त करण्यात आले.
तसेच शालेय अभ्यासक्रमात गो-विज्ञान हा विषय समाविष्ट करावा, या मागण्यांचे निवेदन व स्मरणपत्र संत समाज, गोसेवक व चंद्रपुरातील नागरिकांच्च्या वतीने जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधानांना पाठवून यावर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देतेवेळी मनिष महाराज, रोडमल गहेलोत, डॉ. अशोक जीवतोडे, उज्ज्वल गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष दीपक पारख, सचिव आनंद देशपांडे, प्रा. डॉ. जुगलकिशोर सोमानी, मिलिंद कोतल्लीवार, महावीर मंत्री, रामकिशोर सारडा, हरीश शर्मा, रघुवीर अहीर, रामजीवन परमार, राजेंद्र गांधी, सचिन कोतपल्लीवार आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.