तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
date-college : येथील दाते कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘विद्यारंभ सोहळा’ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू होते. प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ पंचायत समितीचे उपशिक्षणाधिकारी योगेश डाफ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्य संवर्धन आणि समाजाप्रती उत्तरदायित्व निर्माण करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. मोबाईल व समाज माध्यमांचा विवेकपूर्ण वापर करून ज्ञानार्जनाला प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दाते कॉलेजची गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाèया विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमास वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष विनायक दाते आणि उपाध्यक्ष सुषमा दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणातूनच यश, संस्कार आणि उज्ज्वल भविष्य घडते, असा संदेश दिला.
पर्यवेक्षक डॉ. स्वाती जोशी यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेची माहिती दिली. संचालन प्रा. अजय राठोड यांनी आणि प्रा. नितेश गेडाम यांनी आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. शुभम काजळे, डॉ. वैशाली बेडेकर, डॉ. रुकेश पंचभाई, प्रा. मीनाक्षी मोरे, प्रा. राम राठी, प्रा. शीतल राठी, प्रा. अलोणे, प्रा. कल्याणी उघडे, प्रा. सारिका नंदे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाèयांचे मोलाचे सहकार्य लाभले.