पुणे,
trishund-ganpati-temple : सोमवार पेठेतील सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर वर्षातून केवळ एकदाच, गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांसाठी खुले केले जाते. तळघरात असलेल्या गोसावी संप्रदायातील गुरूंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागतात. वर्षभर पाण्याने भरलेले असलेले हे तळघर गुरुपौर्णिमेपूर्वी स्वच्छ करून त्यातील पाणी काढले जाते. त्यामुळे भाविकांना वर्षातून केवळ एकदाच या समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळते.
परंपरेनुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोसावी संप्रदायातील शिष्य आपल्या गुरूंच्या समाधीस्थळी दर्शनासाठी येतात. त्यातूनच या दिवशी तळघर खुले करण्याची प्रथा सुरू झाली. अनेक दशकांपासून ही परंपरा श्रद्धेने जपली जात असून, गुरुपौर्णिमेनिमित्त पुणेकरांसह राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे येतात.
इ.स. १७५४ मध्ये गोसावी संप्रदायातील भीमगिरजी गोसावी यांनी या मंदिराची उभारणी केली. काळ्या दगडात साकारलेले हे मंदिर वेरूळच्या लेण्यांची आठवण करून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्तीही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. तीन सोंडा, सहा हात आणि मोरावर आरूढ अशा स्वरूपात गणपतीची मूर्ती येथे साकारण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपातील गणेशमूर्ती क्वचितच आढळते.
मंदिराच्या तळघरात गोसावी परंपरेशी संबंधित दलपतगिरी यांची समाधी असल्याचे सांगितले जाते. काही ऐतिहासिक नोंदींमध्ये या समाधीचा संबंध भीमजीगिरी किंवा भीमगिरजी गोसावी परंपरेशी जोडला जातो. तळघरात नैसर्गिक झरा असल्याने वर्षभर तेथे पाणी साचलेले असते. गुरुपौर्णिमेपूर्वी तळघराची स्वच्छता करून पाणी काढण्यात येते. त्यानंतर केवळ या एकाच दिवशी भाविकांना समाधीचे दर्शन घेता येते.