बोगस औषधांमुळे आरोग्यासह पुढील पिढीला धोका

- : बोगस औषध पुरवठा प्रकरणात मुंबईच्या आरोपीचा जामीन नाकारला

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
spurious-medicines : बोगस औषधांमुळे लोकांच्या आरोग्यालाच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माणा झाला आहे. या बनावट औषधांमुळे अवयव निकामी होणे किंवा मृत्यू होण्यासारखे गंभीर परिणाम होतात. अशा औषधांचा प्रसार आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास उडवतो, असे उच्च न्यायालयाने बोगस आणि भेसळयुक्त औषधांच्या पुरवठ्याशी संबंधित गंभीर प्रकरणात अडकलेला मुंबई येथील आरोपी रमण विजयकुमार तनेजाचा जामीन अर्ज नाकारला आहे. न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांनी हा निर्णय दिला. बोगस औषधांचा व्यापार समाज आणि भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
 
 
 
jk
 
 
 
आरोपी हा फॉर्मा डिस्ट्रीब्युटरचे काम करायचा. परंतु तो जो गोळ्या बनवायचा त्यात औषधी द्रव्य नसायचे. आरोपीविरूध्द महाराष्ट्रात १३ तर उत्तराखंडमधील पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहेत. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी अन्न निरीक्षक नितीन भांडारकर यांनी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तपासणीसाठी एका टॅबलेटचे नमुने गोळा केले होते. सरकारी विश्लेषकांकडे केलेल्या चाचणीत या गोळ्यांमध्ये मुख्य औषधी घटक आढळलाच नाही. या गोळ्या पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कळमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
 
 
सुनावणीदरम्यान आरोपी रमण तनेजाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, रमणकडे फार्मास्युटिकल्सचा ट्रेडिंग परवाना आहे आणि तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून साहित्य जप्त केले आहे. आरोपी २७ जून २०२४ पासून (सुमारे दोन वर्षे) तुरुंगात असून तपास पूर्ण झाला आहे व चार्जशीटही दाखल झाले आहे, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. मात्र, राज्य सरकारच्या वतीने जामीन अजार्ला तीव्र विरोध करण्यात आला.
 
 
मुख्य आरोपी रॉबिन तनेजा (ज्याचा जामीन आधीच रद्द करण्यात आला आहे) याने आपला भाऊ रमण तनेजा याच्या बँक खात्यात सुमारे २० लाख रुपये ट्रान्सफर केले होते. तसेच सह-आरोपी विजय चौधरी यानेही १.५ लाख रुपये पाठवले होते.
 
बोगस औषधांची बिले
 
 
आरोपीच्या घराच्या झडतीदरम्यान 'फीमाक्स -५00' नावाच्या गोळ्यांचे बिल आढळले. या गोळ्यांचे फोटो सह-आरोपींच्या मोबाईलमध्येही मिळून आले होते आणि या गोळ्या बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. पावडर आणि स्टार्चचा वापर: तपासणीत या बोगस औषधांमध्ये टॅल्कम पावडर आणि स्टार्च वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व पुरावे, बँक खात्यांचे व्यवहार व गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपी रमण हा या संपूर्ण साखळीचा महत्त्वाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आरोपी दोन वर्षांपासून कोठडीत असला तरी त्याला जामीन देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने जामीन नाकारला. आरोपीतर्फे अनिकेत निकम, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी बाजू मांडली.