यवतमाळ,
santosh-dhotre : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सोमवारी पंचायत समिती राळेगाव येथे भेट देऊन तालुक्यातील ग्रामसेवक, विभाग प्रमुख व विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी घरकुल योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, आरोग्य सेवा, वृक्षारोपण तसेच विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
बैठकीत घरकुल योजनेचा सविस्तर आढावा घेताना उद्दिष्टानुसार जास्तीत जास्त घरे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कमी प्रगती असलेल्या आरएचई आणि ग्रामसचिवांच्या कामाचा स्वतंत्र आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासह पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याबरोबरच गावांमध्ये आवश्यक विकासकामे हाती घेण्याचे निर्देश सर्व ग्रामसचिवांना देण्यात आले.
मोडकळीस आलेल्या शासकीय इमारतींच्या निर्लेखनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकाèयांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. गावांमध्ये साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा तसेच पाण्याचे नमुने नियमित तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय उपअभियंता (बांधकाम व पाणीपुरवठा), सीडीपीओ, बीईओ, एलडीओ तसेच कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, एकात्मिक बाल विकास, पंचायत विभाग आणि इतर विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाने दिलेली उद्दिष्टे विहित वेळेत पूर्ण करून विकासकामांना गती देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सर्व संबंधित अधिकाèयांना दिल्या.