नवी दिल्ली,
India's Test squad announced. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून, केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध नसणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा फलंदाज साई सुदर्शन यांचा अंतिम सहभाग सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून मिळणाऱ्या फिटनेस मंजुरीवर अवलंबून राहणार आहे.

या मालिकेसाठी उंच वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारलाही संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी त्याची संघात निवड झाली होती, मात्र त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. यावेळी त्याच्याकडे कसोटी पदार्पणाची संधी असू शकते. याशिवाय मध्य प्रदेशचा अष्टपैलू, ऑफ-स्पिनर आणि डावखुरा फलंदाज सारांश जैन याचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.श्रीलंका दौऱ्यासाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघात शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, जसप्रीत बुमराह (फिटनेस मंजुरीच्या प्रतीक्षेत) आणि साई सुदर्शन (फिटनेस मंजुरीच्या प्रतीक्षेत) यांचा समावेश आहे.भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ते १९ ऑगस्टदरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्टदरम्यान सिंहलीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.