गोंदिया,
rainfall : जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चिंतेत सापडलेल्या जिल्हावासीयांना जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे दिलासा मिळाला आहे. संबंधित विभागाच्या आकडेवारीनुसार 28 जुलैपर्यंत जिल्ह्यात 545.2 मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या 96.1 टक्के आहे. जुलै महिन्यात काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनमधील तुटीची भरपाई झाली असली, तरी जिल्हा अद्यापही सरासरी पर्जन्यमानाच्या उंबरठ्यावरच आहे.
हवामान विभागाच्या पर्जन्यमान अहवालानुसार जुलै महिन्यात जिल्ह्यात 492.1 मिमी पाऊस झाला असून, तो सामान्यच्या 131.3 टक्के आहे. जुलैतील दमदार पावसामुळे धान रोवणीच्या कामांना वेग आला असून शेतकर्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, काही भागांत अद्यापही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धान लागवडीची कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. पावसाच्या तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास गोरेगाव व सालेकसा तालुक्यात सर्वाधिक अनुक्रमे 122.8 व 122.9 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर आमगाव 96.8 टक्के, सडक अर्जुनी 94.5 टक्के, गोंदिया 89.8 टक्के, देवरी 88.4 टक्के, अर्जुनी मोरगाव 74.7 टक्के आणि तिरोडा तालुक्यात सर्वात कमी 65.8 टक्के पाऊस झाला आहे. विशेषतः तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता कायम असल्याने पावसावर अवलंबून असलेल्या शेतीतील धान लागवडीची कामे प्रभावित झाली आहेत. याचा खरीप हंगामातील उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 681.8 मिमी पाऊस झाला होता, तर यंदा तो 545.2 मिमी इतकाच झाला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.
पर्जन्यमानातील विषमता चिंताजनक
पावसाची आकडेवारी शेती, जलसाठे, भूजल पातळी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरवणारा महत्त्वाचा निर्देशक असतो. जुलैतील चांगल्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असला, तरी तालुकानिहाय दिसणारी पर्जन्यमानातील विषमता चिंताजनक आहे.