सेलू,
keljar-bus-stand : वर्धा ते नागपूर मार्गावरील केळझर येथे बसस्थानक असूनही अनेक बसगाड्या गावात न येताच राष्ट्रीय महामार्गावरून बायपासने पुढे जात आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रतीक्षा करूनही बस गावात न आल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे परिसरातील सुमारे २०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोयात आले असून, संबंधित अधिकार्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

केळझर हे तालुयातील महत्त्वाचे गाव असून परिसरातील अनेक गावे याच गावाशी जोडलेली आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथे जादा बसफेर्यांची आवश्यकता आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर गावापासून काही अंतरावर बायपास तयार करण्यात आला. त्यानंतर अनेक बसचालक गावात बस न आणता थेट बायपासनेच पुढे नेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केळझर येथून वडगाव (जंगली), आमगाव (खडकी), जुनगाव, गायमुख, दहेगाव (गोसावी), खडकी, नवरगाव (बु.), सेलू आदी ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी दररोज बसची वाट पाहतात. मात्र, बस न आल्याने त्यांचा वेळ वाया जातो.
या संदर्भात चालक, वाहक व अधिकार्यांना अनेकदा निवेदने देण्यात आली असताना अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी, गावात बस आणण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना अनेकदा दोन तासांहून अधिक वेळ बसची प्रतीक्षा करावी लागते. बस न आल्यास जादा पैसे मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. परतीच्या वेळी रात्री उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना गावापर्यंत पायी जावे लागते. यामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार व सर्वसामान्य प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बसस्थानक असूनही बस गावात न आणणार्या चालक व वाहकांवर संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून केळझर येथे नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री दत्तक ग्राम असलेल्या केळझर गावात बसेस बस स्थानकावर येऊ नये, ही शोकांतिका आहे. वर्धा बस स्थानकावर सर्व जलद बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आल्याचा फलक लावला आहे. मात्र, या फलकाकडे दुर्लक्ष करून बसेस येथील बस स्थानकावर येत नसेल तर लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.