मालेगाव,
malegaon-news : मालेगांव तालुक्यातील दुबळवेल शिवारातील रेल्वे रुळालगत आढळलेल्या अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात जऊळका रेल्वे पोलिसांना यश आले. पोलिसांची तत्परता, तांत्रिक तपास आणि स्थानिक नागरिकांच्या मोलाच्या सहकार्यामुळे मृत व्यक्तीची ओळख लातूर जिल्ह्यातील रहिवासी म्हणून निश्चित करण्यात आली.
माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दुबळवेल परिसरातील रेल्वे रुळाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती जऊळका रेल्वे पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद दामोदर, गजानन काटेकर तसेच पोकॉ विष्णू इंगळे, गोपाळ कव्हर आणि तुकाराम उगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत दुबळवेल येथील विकास सावंत, संतोष लबडे, साहेबराव पोकळे, गणेश लबडे, भवानी पोफळे, राहुल लबडे, मंगेश वाघमारे, सुनील गवई तसेच वाशीम येथील सरकार सैलानी ट्रक मालक - चालक असोसिएशन यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
संयुक्त प्रयत्नांना अखेर यश आले असून, मृत व्यक्तीची ओळख जलील अब्बास शेख वय ३९ राहणार भाडगाव, तालुका आणि जिल्हा लातूर अशी पटली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जऊळका रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.