गोंदिया,
molestation-of-minor-female-students : एका शिक्षकानेच गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याचा संतापजनक प्रकार गोंदिया तालुक्यात उघडकीस आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत येणार्या गिरोला (कामठा) येथील जि.प. प्राथमिक शाळेतील 55 वर्षीय शिक्षकाने तिसर्या वर्गातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. संतप्त ग्रामस्थांनी रावणवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत त्या विकृत शिक्षकाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षकाच्या विकृत वर्तनाची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी तालुक्यातील डांगोरली येथे कार्यरत असतानाही त्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे. पहिल्या घटनेनंतरही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने आणि प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यानेच त्याने पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान, गिरोला शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत झालेल्या या प्रकारानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी तातडीने रावणवाडी पोलिस ठाणे गाठून या विकृत शिक्षकावर तात्काळ कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पीडित विद्यार्थीनी व त्यांच्या पालकांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती रावणवाडीचे पोलिस निरीक्षक रामदास शेवते यांनी दिली आहे. तर गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांना यासंदर्भात विचारणा केली असता पोलिस कारवाई पुर्ण झाल्यानंतर पंचायत समितीकडे तक्रार प्राप्त होताच सदर शिक्षकाच्या निलबंनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवेतून बडतर्फ करा...
वारंवार विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल होऊनही संबंधित शिक्षक सेवेत कसा? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित शिक्षकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह पालकांकडून केली जात आहे.