अखेर एमएसएफडीएचा अभ्यासक्रम झाला ऐच्छिक

शैक्षिक महासंघाच्या पाठपुराव्याचे यश

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
अमरावती, २८ जुलै
msfda-syllabus : अखेर एमएसएफडीएच्या युजी ४.० या ऑनलाईन अभ्यासक्रमाची सक्तीची अट शिथील करण्यात आली आहे. शैक्षिक महासंघाच्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे.
 
 

jk
 
 
 
शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि व्यावसायिक क्षमतावृद्धी ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत बदलत्या शैक्षणिक प्रवाहात अत्यावश्यक असल्याची भूमिका अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सातत्याने मांडत असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्या दिशेने कार्य करीत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) यांच्या युजी ४.० ऑनलाईन अभ्यासक्रमाबाबत निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशांमुळे राज्यातील शिक्षण संस्था, महाविद्यालये, संस्था संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम व असंतोष निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने उच्च शिक्षण संचालकांना निवेदन सादर करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सक्ती, एक हजार शुल्क आकारणी, केवळ इंग्रजी माध्यमातील उपलब्धता आणि १०० टक्के नोंदणीच्या निर्देशांबाबत ठोस आक्षेप नोंदविला होता.
 
महासंघाच्या निवेदनाची दखल घेत उच्च शिक्षण संचालनालयाने २७ जुलै रोजी सुधारित सूचना प्रसिद्ध केली. यात पूर्वीप्रमाणे अनिवार्य पूर्णत्वावर भर न देता, महाविद्यालयांनी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना युजी ४.० अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी सुधारित भूमिका मांडण्यात आली आहे. शिक्षकांच्या हितासाठी सातत्याने आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या सकारात्मक निर्णयाबद्दल उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे महासंघाने आभार मानले आहे.
 
 
तथापि, महासंघाने स्पष्ट केले की, युजी ४.० अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांना पूर्ण पाठिंबा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षकांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा. मात्र, हा अभ्यासक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय उच्च शिक्षण सचिव प्रा. प्रदीप खेडकर यांनी दिली.