मल्याळम अभिनेते मुरुगन पनाविला यांचे निधन

अवयवदानातून पाच जणांना जीवनदान

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
कोझिकोड,
Murugan Panavila passes away मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेते मुरुगन पनाविला यांचे २५ जुलै रोजी वयाच्या ४६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मल्याळम कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या मुरुगन यांनी मृत्यूनंतरही अवयवदानाच्या माध्यमातून पाच जणांना नवे जीवन देत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले. माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील वडाकारा येथे एका नाट्यप्रयोगाच्या सरावादरम्यान मुरुगन पनाविला यांना अचानक ब्रेन हेमरेज झाला आणि ते रंगमंचावरच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तिरुवनंतपुरम येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
 
 

zwrt 
डॉक्टरांच्या पथकाने सलग चार दिवस त्यांच्यावर उपचार केले. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपट आणि नाट्यसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली.मुरुगन पनाविला यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कुटुंबाच्या संमतीनंतर डॉक्टरांनी त्यांचे अवयव सुरक्षितपणे प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करून दिले. या अवयवदानामुळे पाच गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. मुरुगन पनाविला यांच्या कुटुंबाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.