वर्धा रोडवर तासभर कोंडी, प्रवाशांचे हाल
अनिल कांबळे
नागपूर,
heavy rain शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अवघ्या दोन तासांच्या पावसात अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचे अक्षरशः तीन तेरा वाजले. शहरातील विविध चौक आणि मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने हजारो वाहनचालक व प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागले.
मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. लोहापूल, धंतोली पूल आणि नरेंद्रनगर पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गांवर वाहतूक धोकादायक बनली. काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले होते.
सीताबर्डी, पंचशील चौक, मोरभवन, धंतोली, धरमपेठ, बजाजनगर, लक्ष्मीनगर आणि मेडिकल चौक परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची रांग लागली होती. अनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथेही वाहतुकीचा ताण वाढल्याने संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सर्वाधिक फटका वर्धा रोडवरील वाहतुकीला बसला. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबलचक रांग लागली आणि जवळपास तासभर वाहतूक ठप्प झाली होती. एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स, शालेय बसेस तसेच चारचाकी वाहनांमधील प्रवाशांना दीर्घकाळ कोंडीत अडकून राहावे लागले. अनेकांना वेळेवर कार्यालय, शाळा किंवा इतर ठिकाणी पोहोचता आले नाही.
दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून योग्य नियोजन आणि तातडीने वाहतूक वळविण्याची प्रभावी व्यवस्था न झाल्याने कोंडी आणखी वाढल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली. अनेक चौकांवर वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने वाहनांच्या रांगा वाढत गेल्या. परिणामी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागला. पावसाळ्यातील वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत वाहतूक विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.