नागपूर,
laxmanrao-joshi : पत्रकारितेच्या क्षेत्रातील तपस्वी व दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि प्रबंध संचालक, राजकीय-सामाजिक विषयांचे विश्लेषक आणि नि:स्पृह व्यक्तिमत्त्वाचे धनी लक्ष्मण त्र्यंबक जोशी यांचे मंगळवार, २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता देवनगर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ऊर्मिला, तसेच अंजली प्रकाश मुळावकर व देवयानी संदीप भोपे या कन्या, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

मूळ पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील असलेल्या लक्ष्मणरावांनी १९६७ साली दै. तरुण भारतमधू्न पत्रकारितेला प्रारंभ केला. त्याआधी पाच वर्षे त्यांनी भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात शिक्षक म्हणून कार्य केले. पत्रकारितेतील सर्वाधिक काळ त्यांनी ‘तरुण भारत’मध्ये व्यतीत केला. त्यानंतर गोमंतक, गोवादूत, जळगाव तरुण भारत, मुंबई तरुण भारत येथेही त्यांनी संपादकपद भूषविले. नागपूरच्या लोकशाही वार्ता या दैनिकातही मुख्य संपादक म्हणून त्यांनी यशस्वी रीत्या जबाबदारी पार पाडली. प्रामाणिकपणा, निर्भीड लेखन आणि सामाजिक बांधिलकी त्यांनी प्रकर्षाने जपली. त्यांनी त्यांच्या लेखणीतून अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडली. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या. वृत्तपत्रीय लेखनशैलीचे, वैचारिक चिंतनाचे, संतुलित दृष्टिकोनाचे व माध्यम अनुशासनाचे धडे व संस्कार त्यांनी अनेकांवर केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांना ‘पाञ्चजन्य’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांचे ‘गावोगावी’ हे आत्मचरित्र तसेच ‘सारांश’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
त्यांची अन्त्ययात्रा बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता पुखराज ट्यूलिप अपार्टमेंट्स, सहकारनगर, नागपूर येथील निवासस्थानावरून निघून सहकार नगर घाटावर जाईल. तेथे त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात येईल.
प्रतिक्रिया,
मूल्याधिष्ठित पत्रकारितेची समृद्ध परंपरा जपली
नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक भान यांचा संगम असलेली त्यांची पत्रकारिता प्रेरणादायी ठरली. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजमन जपण्याचे कार्य केले, तसेच असंख्य पत्रकारांना मार्गदर्शन करीत, मूल्याधिष्ठित पत्रकारितेची समृद्ध परंपरा जपली. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता क्षेत्राने एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
---------------------
व्रतस्थ व आदर्श पत्रकारिता
ज्येष्ठ पत्रकार, संपादक लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. लक्ष्मणराव यांनी अनेक दशके व्रतस्थ आणि आदर्श पत्रकारिता केली. त्यांनी अनेक पत्रकारांना घडविले व त्यांच्या लेखणीला धार देण्याचे काम केले. आपल्या लेखणीतून ते शेवटपर्यंत समाजप्रबोधनाचे कार्य करीत राहिले. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
---------------------------
सत्यान्वेषी पत्रकारितेचे पर्व काळाच्या पडद्याआड
लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाने सत्यान्वेषी आणि व्यासंगी पत्रकारितेचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लक्ष्मणराव पत्रकारितेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे कार्य केले. पत्रकार कधी निवृत्त होत नाही, असे ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. शांत आणि संयमी स्वभावाच्या या ज्येष्ठ संपादकाने पत्रकारितेतील मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. त्यांची उणीव नेहमी जाणवत राहील. दिवंगत लक्ष्मणराव जोशी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
------------------
सत्याधिष्ठित लिखाण करणारे संपादक
वृत्तपत्र क्षेत्रात सत्याधिष्ठित लिखाण व मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ संपादक काळाच्या पडद्याआड गेला, याचे अतीव दु:ख आहे. लक्ष्मणराव जोशी यांचे लिखाण अतिशय उच्च दर्जाचे आणि सामाजिक भान जपणारे होते. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. समाजहितासाठी आवश्यक असलेले लिखाण लक्ष्मणरावांनी अतिशय प्रभावीपणे केले. त्यांच्या लेखणीला सत्याचे अधिष्ठान होते. माध्यम क्षेत्रातील लोकांनी लक्ष्मणरावांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. विलास डांगरे
अध्यक्ष, श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड
---------------------
पत्रकारितेत प्रचंड योगदान
लक्ष्मणराव जोशी यांनी दै. तरुण भारतचे मुख्य संपादक म्हणून अतिशय प्रभावीपणे कार्य केले. मुंबई तरुण भारतचे संपादक म्हणूनही त्यांनी उत्तम रीत्या जबाबदारी पार पाडली. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले प्रचंड योगदान कधीही विसरता येणार नाही. माध्यम क्षेत्रातील मंडळी त्यांना गुरुस्थानी मानतात. विविध सामाजिक तसेच राजकीय विषय त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
अनिल दांडेकर
माजी प्रबंध संचालक
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड
---------------
तरुण भारत परिवार ज्येष्ठ मार्गदर्शकास मुकला
लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनामुळे तरुण भारत परिवार ज्येष्ठ मार्गदर्शकास मुकला आहे. लक्ष्मणरावांनी तरुण भारतमध्ये दीर्घकाळ सेवा दिली. कनिष्ठ पातळीवरील सहकारी ते मुख्य संपादक आणि प्रबंध संचालक अशा विविध भूमिकांत त्यांनी तरुण भारतसाठी कार्य केले. सव्यसाची आणि परखड पत्रकारिता आणि स्पष्टवादी लेखनासाठी बृहन्महाराष्ट्रात ख्यातकीर्त असलेले लक्ष्मणराव अखेरपर्यंत तरुण भारतात मार्गदर्शन करीत होते. विशेषत:, तरुण भारतच्या शताब्दी पर्वात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संस्थेच्या प्रवासातील अनेक ऐतिहासिक प्रसंग त्यांनी सांगितले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वास आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.
धनंजय बापट
प्रबंध संचालक
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड