हृदयविकाराच्या झटक्याने पावला श्यामला यांचे निधन

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
हैदराबाद,
pavla shyamla तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री पावला श्यामला यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. हैदराबाद येथील उस्मानिया जनरल रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवार, २८ जुलै रोजी पहाटे १.५२ वाजता तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी उपचारांचे सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांच्या निधनामुळे टॉलीवूडमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
pavla shyamla
 
रुग्णालयाच्या अधिकृत माहितीनुसार, पावला श्यामला या गेल्या काही काळापासून वयोमानामुळे उद्भवलेल्या विविध आजारांनी त्रस्त होत्या. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना उस्मानिया जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह सध्या रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून अंत्यसंस्काराबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
 
पावला श्यामला यांनी तीन दशकांहून अधिक काळ तेलुगू चित्रपटसृष्टीत सहाय्यक आणि विनोदी भूमिकांमधून वेगळी ओळख निर्माण केली. मात्र आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना गंभीर आर्थिक आणि आरोग्यविषयक संकटांचा सामना करावा लागला. स्वतःच्या प्रकृतीची झुंज देतानाच त्या आपल्या आजारी मुलीची देखील काळजी घेत होत्या. निधीअभावी याच वर्षी मे महिन्यात एका रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली होती.
 
काही दिवसांपूर्वी त्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आल्या होत्या. रुग्णालयातून परतल्यानंतर एका टॅक्सी चालकाने त्यांना रात्री रस्त्यावर सोडल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांना आरके फाउंडेशनमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर चित्रपट निर्माते आणि फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष दिल राजू व त्यांच्या टीमने पुढाकार घेत त्यांच्या उपचारांची व्यवस्था केली. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये घरभाडे न भरल्यामुळे त्यांना घर सोडावे लागले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला एका धर्मादाय आश्रमात आश्रय उपलब्ध करून दिला होता.
 
'गोलिमार', 'खरगम', 'आंध्रवाला', 'वर्षम' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी चिरंजीवी, प्रभास, ज्युनियर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांसारख्या आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला 'माथू वदलारा' हा त्यांचा शेवटचा मोठा चित्रपट ठरला. त्यांच्या कठीण काळात २०२१ मध्ये दिग्दर्शक जोडी राज आणि डीके यांनी सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले होते. तसेच चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन आणि साई दुर्गा तेज यांनीही त्यांना मदतीचा हात दिला होता.