धारणी,
prabhudas-bhilavekar : मेळघाटातील टिटंबा शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून पुरविण्यात आलेल्या अन्नामुळे झालेल्या कथित विषबाधा प्रकरणानंतर काही जणांकडून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करणे योग्य नसून हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची भूमिका भाजपाचे मेळघाट जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी मांडली.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत भिलावेकर पुढे म्हणाले की, सेंट्रल किचन ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पोषणयुक्त भोजन उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. टिटंबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तातडीने मेळघाटचा दौरा केला. त्यांनी धारणी टिटंबा आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थी, पालक आणि विविध आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेनंतर विद्यार्थी व पालकांच्या मागणीचा विचार करून टेंबली येथील सेंट्रल किचन व्यवस्था तात्काळ तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित कंत्राटदार कंपनीच्या संचालकांविरुद्ध धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याशिवाय संबंधित आश्रम शाळेच्या अधीक्षकाला निलंबित करण्यात आले असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शासनाने दोषींवर त्वरित कारवाईची प्रक्रिया सुरू केली असताना काही स्वयंघोषित नेत्यांकडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप भिलावेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला क्षमा चौकसे, जया खंडारे, सुनंदा भिलावेकर, आप्पा पाटील, विवेक नवलाखे, श्याम गंगराडे, प्रतीक मालविया, अंबर बनसोड, रोहित पाल, अशोक मावस्कर तसेच महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.