तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड सहन करणार नसल्याचा इशारा यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांनी फातिमा शेख नप शाळा पाहणी करताना दिला. तसेच पाहणीदरम्यान अनियमितता आढळल्याने मुख्याध्यापक सैयद मजहर अली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश यावेळी देण्यात आले आहे.
नप शाळेला नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी मंगळवार, 28 जुलै रोजी अचानक भेट देत शाळेच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शाळेतील विविध बाबींची सखोल तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, शैक्षणिक सुविधा तसेच शाळेतील दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच काही शिक्षकही विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यांची तत्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसेच प्रत्यक्ष पाहणीत समोर आलेल्या बाबींची नोंद घेण्यात आली असून संबंधित अधिकारी व शिक्षकांवरही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी स्पष्टपणे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. नगर परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आणि शिक्षकांनी आपल्या जबाबदाèया प्रामाणिकपणे पार पाडणे, ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
शाळांमध्ये शिस्त, नियमित उपस्थिती आणि दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी अशा अचानक पाहण्या यापुढेही सुरू राहतील. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात कोणताही हलगर्जीपणा करणाèया शिक्षक, अधिकारी किंवा कर्मचाèयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.