'किल' पूर्वी राघवला बसला मोठा धक्का!

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
मुंबई,
raghav juyal नर्तक, सूत्रसंचालक आणि अभिनेता राघव जुयाल लवकरच 'भाई तेरा स्टार है' या चित्रपटातून प्रथमच एकल नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र या नव्या टप्प्यापूर्वी त्याने कारकिर्दीतील एक कटू अनुभव सांगत, चित्रीकरण सुरू होण्याच्या अगोदरच एका मोठ्या चित्रपटातून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचा खुलासा केला आहे. न्यूज18ला दिलेल्या मुलाखतीत राघवने सांगितले की, 'किल' चित्रपट मिळण्यापूर्वी त्याची एका मोठ्या निर्मिती संस्थेच्या चित्रपटासाठी निवड झाली होती. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर अचानक निर्मात्यांकडून संपर्क बंद झाला. त्याने चौकशी केली असता, चित्रपटासाठी अधिक प्रसिद्ध चेहरा शोधला जात असल्याचे त्याला सांगण्यात आले.
 
raghav juyal
 
राघवने सुरुवातीला हा प्रकार विनोदाने घेतला. त्याने निर्मात्यांना गंमतीत आपण चेहरा आणखी भरदार करून येतो, असेही सांगितले. मात्र नंतर त्याला समजले की, चित्रपटातील मुख्य अभिनेत्यानेच निर्मात्यांना त्याला त्या प्रकल्पातून वगळण्यास सांगितले होते. ही बाब समजल्यानंतर आपण खूप दुखावलो गेलो होतो, असे त्याने मुलाखतीत सांगितले. या अनुभवाकडे पाहताना राघवने नियतीवर विश्वास व्यक्त केला. ज्या चित्रपटातून त्याला बाहेर काढण्यात आले होते, तो चित्रपट अखेरीस बनलाच नाही. त्यानंतर त्याला दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांच्या 'किल' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात लक्ष्यसोबत काम करण्याची संधी मिळाली. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आणि राघवच्या अभिनयाचेही विशेष कौतुक झाले.
 
दरम्यान, विवेक बी. अग्रवाल दिग्दर्शित 'भाई तेरा स्टार है' हा चित्रपट ३० जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राघव जुयालसोबत संजय कपूर, निहारिका एन.एम. आणि निकी वालिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून राघव पहिल्यांदाच मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.