पावसाचा इशारा; नागपूरमध्ये उद्या शाळांना सुटी!

-पुढील तीन दिवस खबरदारी घेण्याचे आवाहन -शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर -खबरदारी घेण्याचे आदेश

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
नागपूर, 
rain-warning : नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उद्या बुधवार, २९ जुलै रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा व कामठी तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
 
hjk
 
 
  
हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
 
 
३० जुलै रोजी नागपूरला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत विदर्भात सर्वाधिक १३९ मिमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे १०३.४ मिमी पाऊस झाला. या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.
 
हवामान विभागानुसार बुधवार, २९ जुलै रोजी नागपूर, भंडारा, वर्धा, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर यवतमाळसह अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यास रेड अलर्ट असून भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ३१ जुलै रोजी अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
मेघगर्जना सुरू असताना उघड्यावर थांबणे, झाडाखाली आश्रय घेणे टाळावे, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, तसेच वीज पडण्याच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.