बंगळुरू,
regret of educated youth from Bangalore बंगळुरूमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वरील एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. दरमहा ₹२ लाख पगार मिळत असूनही आणि कोणत्याही प्रकारचा ईएमआय नसतानाही स्वतःला आर्थिकदृष्ट्या असुरक्षित वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. पैशांची कमतरता नसूनही भविष्यातील जबाबदाऱ्यांमुळे आपण गरीब असल्यासारखे वाटत असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.त्या तरुणाने सांगितले की, वयाच्या २१ वर्षांपर्यंत त्याचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत होते. कुटुंबाचे मासिक उत्पन्न कधीही ₹६,००० ते ₹७,००० पेक्षा जास्त नव्हते आणि संपूर्ण कुटुंब १० बाय १० फूटाच्या एका छोट्या खोलीत राहत होते. २०२१ मध्ये पहिली नोकरी मिळाल्यानंतर आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्याचा निर्धार त्याने केला.

नोकरी लागल्यानंतर त्याने आई-वडिलांना कामातून निवृत्त केले आणि त्यांना मूळ गावी दोन बीएचके घरात राहण्याची व्यवस्था करून दिली. स्वतः तो बंगळुरूमध्ये दोन बीएचके घरात राहतो. दरमहा तो ₹३०,००० म्युच्युअल फंडात, ₹१०,००० मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेवींमध्ये, ₹१०,००० सोन्यात गुंतवतो. याशिवाय आई-वडिलांना दरमहा ₹१५,००० ते ₹२०,००० पाठवतो, तर घरभाडे आणि इतर खर्च मिळून सुमारे ₹२५,००० खर्च होतो.त्याच्या म्हणण्यानुसार, २०२१ पासून त्याने शेअर बाजारात ₹४ लाख, मुदत ठेवींमध्ये ₹२ लाख आणि सोन्यात सुमारे ₹२ ते ₹२.५ लाखांची बचत केली आहे. तसेच पगाराच्या खात्यात सुमारे ₹६ लाख शिल्लक आहेत. त्याने स्वतःसाठी स्कूटर, मॅकबुक आणि स्मार्टफोन खरेदी केला असून घराची सजावटही बदलली आहे. आई-वडिलांसाठी आरोग्य विमा आणि स्वतःसाठी जीवन विमाही घेतला आहे.
इतके सर्व असूनही आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत, असे वाटत नसल्याचे त्याने नमूद केले. त्याच्या मते, अडचण पैशांच्या कमतरतेची नसून प्रत्येक मोठ्या खर्चासाठी दुसऱ्या स्वप्नाशी तडजोड करावी लागते, ही भावना सतत मनात राहते. यावर्षी लग्नासाठी किमान ₹१० लाख खर्च अपेक्षित असून, जुनी कार आणि मूळ गावी जमिनीचा भूखंड खरेदी करण्याचाही त्याचा विचार आहे. तसेच नवीन बाईक घेण्याचीही इच्छा आहे. पोस्टच्या शेवटी त्याने आपल्या मूळ गावातील अनेक मित्र मजुरी किंवा ऑटोचालक म्हणून काम करत असले, तरी कमी उत्पन्नातही ते अधिक आनंदी असल्याचे नमूद केले. स्वतः मात्र वयाच्या २६ व्या वर्षी चांगले उत्पन्न आणि बचत असूनही आर्थिक चिंतेतून बाहेर पडू शकत नसल्याचे सांगत त्याने रेडिटवरील इतर वापरकर्त्यांकडून सल्ला मागितला आहे.