दादांच्या विमान दुर्घटनेचा अहवाल कुठे?

युगेंद्र पवारांचा तपास यंत्रणांना थेट सवाल

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
बारामती,
report on Dada's plane crash बारामती येथे प्रचारासाठी येत असताना २८ जानेवारी रोजी गोजुबावी गावाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत दिवंगत अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि अंगरक्षक यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाले असतानाही अंतिम चौकशी अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने युगेंद्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी तपास यंत्रणांकडे केली.युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला सहा महिने उलटले, मात्र या कालावधीत दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला सादर करण्यात आलेला प्राथमिक अहवाल समाधानकारक नसल्याचा दावा करत त्यांनी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे म्हटले. त्यामुळे सखोल तपास करून अंतिम निष्कर्ष जाहीर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
pawar
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, या दुर्घटनेबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तपास यंत्रणांनी संयम राखण्याचे आवाहन केले होते, त्यामुळे कुटुंबीय आणि समर्थकांनीही अहवालाची प्रतीक्षा केली. मात्र सहा महिने उलटूनही ठोस माहिती समोर आलेली नसल्याने संभ्रम अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.युगेंद्र पवार यांनी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचाही उल्लेख करत, त्या प्रकरणातील चौकशी प्रक्रियेचा संदर्भ दिला. मोठ्या विमान दुर्घटनांमध्ये सत्य समोर येण्यासाठी विलंब होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबाबत सर्व तथ्ये जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
 
 
मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज अद्याप सार्वजनिक झाले नसल्याचाही मुद्दा उपस्थित करत त्यांनी सीआयडी आणि डीजीसीएसारख्या यंत्रणा तपास करत असताना अंतिम कारण समोर येण्यासाठी इतका वेळ का लागत आहे, असा सवाल उपस्थित केला. बारामतीतील नागरिकांच्या मनातही हाच प्रश्न असल्याचे ते म्हणाले.युगेंद्र पवार यांनी व्हीएसआरच्या मालकाविरोधात अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला. इतकी गंभीर दुर्घटना घडूनही जबाबदारी निश्चित करण्यात विलंब होत असल्याचे सांगत त्यांनी तपास यंत्रणांनी दुसरा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी केली.
 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही बैठक झाली होती. याबाबत विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले की, शरद पवार हे देशातील सर्वाधिक अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना आपले मार्गदर्शक मानल्याचे अनेकदा सांगितले आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याचा दावा त्यांनी केला.