आभाळ टनभर, पाऊस कणभर

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
वर्धा,
rainfall-in-wardha : आकाश काळभोरं होतं... वातावरणात थंडावा सुटतो... मुसळधार पावसाची वातावरण निर्मिती होते..., पण हे चित्र क्षणातच बदलते... तो केवळ पिकांची पाने ओली करतो. मृग नक्षत्रापासून जिल्ह्यात पाऊस असाच पडत असून या पावसाने पिकांना केवळ संजीवनी मिळत आहे.
 
 
jk
 
 
 
गत आठवड्यात तीन दिवस आलेल्या पावसाने पिकांना नवसजीवनी मिळाली, परंतु पावसाला जोर नव्हता. या पावसाने शेतातून पाणीसुद्धा निघाले नाही. जुलै महिना संपत असताना नदी, नाले कोरडेच आहेत. विहिरींची पाणीपातळी वाढली नाही, तर मरणासन्न झालेली पिके तेवढी जगली. बुधवारपासून पुन्हा पावसाने खंड दिला. या उघडीपमध्ये शेतकर्यांनी निंदण, फवारणी, खते देणे आदी कामे करून घेतली. पुन्हा शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागले. पुष्य नक्षत्र सुरू आहे. पंढरपूरची आषाढी एकादशी होताच पाऊस येईल, अशी अनेकांची धारणा होती, पण पाऊस आलाच नाही.
 
 
मंगळवार २८ रोजी सायंकाळी ४ वाजता मेघ दाटून आल्याने मुसळधार पाऊस येईल, असे वाटत होते. पावसाची रिपरिप सुरू झाली. घटकाभर आलेल्या पावसाने पिकांची पाने तेवढी ओली केली, तर जमीन कोरडची ठेवली. जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. निम्मे पावसाळा संपत आला. नदी, नाले कोरडेच आहे. जमिनीत ओलावासुद्धा पुरेसा नाही. दमदार पावसाअभावी पिकांची वाढसुद्धा खुंटली असून किडींचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे.