वर्धा,
school-van-overturned : वर्धा-यवतमाळ बायपासवरून रायजादा टाऊनकडे जाणार्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या अरुंद व खड्डेमय रस्त्यावर मंगळवार २८ रोजी दुपारी स्कूल व्हॅन अनियंत्रित होऊन उलटली. सुदैवाने त्यावेळी व्हॅनमध्ये विद्यार्थी नव्हता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा-यवतमाळ बायपासच्या स्व्हिहस रोडवरून रायजादा टाऊनकडे जाणारा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास असून, पावसाळ्यात रस्त्याची स्थिती आणखी बिकट होत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. मंगळवारी दुपारी एम. एच. ३२ क्यू. ३६०५ क्रमांकाची स्कूल व्हॅन विद्याथ्र्यांना रायजादा टाऊनमध्ये सोडल्यानंतर परत येत होती. यावेळी खराब रस्त्यावर समोरून येणार्या दुचाकीला साईड देण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन उलटली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र व्हॅनचे मोठे नुकसान झाले. या रस्त्याच्या बांधकामासाठी वारंवार निवेदनं देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.