व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचे 'मौनभंग'

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
मुंबई,
shilpa shetty बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावाने जातीनिहाय आरक्षणासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित वक्तव्यावर अखेर तिने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या नावाने प्रसारित करण्यात आलेले विधान पूर्णपणे खोटे, बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करत तिने अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन चाहत्यांना केले आहे. सोशल मीडियावर अलीकडेच एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यामध्ये शिल्पा शेट्टी यांनी जातिआधारित आरक्षण व्यवस्थेला विरोध दर्शविल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत शिल्पाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली.
 
shilpa shetty
 
शिल्पा शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आरक्षणासंदर्भातील खोटी विधाने तिच्या नावाने पसरवली जात असल्याचे पाहून तिला धक्का बसला आहे. हा प्रचार पूर्णपणे खोटा आणि द्वेषातून केला जात असल्याचे तिने नमूद केले. तसेच अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही तिने केले. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टी यांच्या नावाने असा दावा करण्यात आला होता की, सर्वसाधारण प्रवर्गातील डॉक्टरांनी फक्त सर्वसाधारण प्रवर्गातील रुग्णांवर उपचार करावेत, तर इतर समाजातील डॉक्टरांनी त्यांच्या समाजातील रुग्णांवर उपचार करावेत. पुढे आरक्षणामुळे गुणवत्ता मिळत नसल्याचा उल्लेख करत आरक्षण रद्द करण्याची मागणी लोक स्वतः करतील, असेही त्या कथित पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. हा मजकूर आपल्या नावाने जोडला गेला असला तरी त्याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे शिल्पाने स्पष्ट केले.
 
दरम्यान, अभिनय क्षेत्रात शिल्पा शेट्टी नुकतीच ध्रुव सर्जा अभिनीत 'केडी: द डेव्हिल' या कन्नड चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ३० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच तिने 'माँ है ना' या कुकिंग रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले असून, हा कार्यक्रम १ जुलै रोजी संपला. सोशल मीडियावरही शिल्पा नियमितपणे सक्रिय असून ती चाहत्यांसोबत फिटनेस, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते.