गोंदिया,
statewide-protest : राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांचे मानधन गेल्या आठ महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, राज्यस्तरावर वेतनाचा निधी उपलब्ध असताना संबंधित अधिकार्यांच्या दिरंगाईमुळे मानधन अडल्याचा आरोप या कंत्राटी कर्मचार्यांनी केला असून 23 जुलैपासून जिल्हा परिषद स्तरावर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता 3 ऑगस्टपर्यंत थकीत मानधन अदा न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे.

कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, गेली सुमारे दोन दशके जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, सर्वेक्षण आणि ग्रामीण स्वच्छतेसाठी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले आहे. अत्यल्प मानधन, मर्यादित सुविधा आणि सातत्याने वाढणारा कामाचा ताण सहन करत त्यांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. अलीकडेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे अतिरिक्त अभियान संचालक यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते पंढरपूर येथे सन्मान करण्यात आला. मात्र, हा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष अहोरात्र मेहनत करणार्या कंत्राटी कर्मचार्यांचेच आठ महिन्यांचे मानधन थकीत असल्याने कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यस्तरावर निधी उपलब्ध असतानाही मानधन अदा होत नसल्यामुळे कर्मचार्यांचा सरकार व प्रशासनावरील रोष वाढत असून, तातडीने वेतन वितरित करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सरकार या प्रश्नावर कोणता निर्णय घेते आणि 3 ऑगस्टपूर्वी कर्मचार्यांचे थकीत मानधन अदा होते का, याकडे राज्यभरातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या कंत्राटी कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून कर्मचार्यांना वेतन मिळाले नसले तरी कर्मचार्यांकडून प्रामाणिकपणे काम केले जात आहे. याचेच फळ शासनाकडून विभागातील अधिकार्यांना पुरस्कृत केले जात आहे. एकंदरीत अधिकार्यांना पुरस्कार आणि कर्मचार्यांना उपासमार असे विरोधाभासी चित्र राज्यात निर्माण झाले आहे.
- अतुल गजभीये, समन्वयक, राज्य संघटना