वर्धा,
jam-medical-college-buildings : जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे होणार आहे. या महाविद्यालयासाठी ६ वास्तूविशारदांनी रेखाचित्र सादर केली होती. सादरीकरणानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये सा. बां. विभागाने नागपूर येथील अश्पाक अहमद नामक एजन्सीचे रेखाचित्र फायनल केले होते. एप्रिल महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध इमारतींना शासनाकडून तांत्रिक मान्यता मिळाली असून आता लवकरच निविदा प्रक्रिया सा. बां. विभागाच्या वतीने पूर्ण केली जाणार आहे.

जिल्ह्यात वर्धा शहराशेजारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीचा मूळ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. सदर प्रस्ताव मुंबई दरबारी असताना हे वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट आणि समुद्रपूर येथे उभारण्यात यावे अशी मागणी झाली. नंतर हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आ. समीर कुणावार यांनी विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन केले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी जाहीर केलेले वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात उभारण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नंतर त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला. जाम येथील कृषी विभागाची जागा निश्चित करण्यात आल्यावर ४०३.८९ कोटींच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आता तांत्रिक मान्यताही मिळाल्याने सा. बां. विभागाच्या वतीने निविदा प्रक्रियेची कारवाई केली जात आहे.
प्रशासकीय मान्यता मिळताच आणि जागा हस्तांतरण होताच सा. बां. विभागाने खाजगी वास्तूविशारदांकडून वैद्यकीय महाविद्यालय कसे असावे, याबाबत रेखाचित्र मागविली. आयाम एमजीएम असोसिएशन, आर्किटेक्चर पॅराडाइम, अश्पाक अहमद कन्सल्टन्सी स्व्हिहसेस प्रा. लि., म्युरेलेज, प्रिझम इन्फ्राटेक, एस. के. ए. कन्सोर्टियम या ६ वास्तूविशारदांनी सा. बां. विभागाला रेखाचित्र सादर केली होती. यात लखनऊ येथील एका वास्तूविशारद एजन्सीचाही समावेश होता. सादरीकरणाअंती नागपूर येथील अश्पाक अहमद नामक एजन्सीचे रेखाचित्र फायनल करण्यात आले होते. या एजन्सीला ४ सप्टेंबर २०२५ रोजी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कार्यारंभ आदेशही सा. बां. विभागाच्या वतीने देण्यात आला होता.
जाम येथील सर्वे क्र. ३२० ही २०.७२ हेक्टर जमीन कृषी विभागाच्या मालकीची आहे. त्यापैकी १२ हेक्टर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरोग्य विभागाला ८ मे च्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये हस्तातरण करण्याचे आदेश मिळाल्यावर हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकार्यांनी एक आदेश निर्गमित करून १२ हेक्टर जमीन आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. याच १२ हेक्टर जमिनीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
तब्बल १२ प्रमुख इमारती
जाम येथे सुमारे ४०३.८९ कोटींचा निधी खर्च करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाची १२ हेक्टर जमीन आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. याच १२ हेक्टर जागेवर तब्बल १२ प्रमुख इमारती बांधण्यात येणार आहे. यात वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची इमारत, वैद्यकीय अधिष्ठाता कार्यालय, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, मुलींचे नर्स वसतिगृह, विद्यार्थी मुलींचे वसतिगृह, विद्यार्थी मुलांचे वसतिगृह, रहिवासी वसाहत, गेस्ट हाऊस, सचिव कक्ष, शव गृह, पाकगृह, कपडे धुण्याचे स्थळ आदी इमारतींचा समावेश आहे.