shravan fast श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असला तरी आयुर्वेदातही या काळातील उपवासाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भगवान शिवाच्या भक्तीबरोबरच शरीर निरोगी ठेवण्यासाठीही श्रावणातील उपवास उपयुक्त ठरू शकतो, असे आयुर्वेदिक तज्ज्ञांचे मत आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होत असल्याने या काळात नियंत्रित आहार आणि उपवास शरीराला लाभदायक ठरतो.

आशा आयुर्वेद क्लिनिकच्या आयुर्वेदिक डॉक्टर चंचल शर्मा यांच्या मते, श्रावण महिन्यात उपवास केल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. उपवासादरम्यान द्रवपदार्थांचे सेवन वाढल्याने शरीराचे शुद्धीकरण होते आणि पचनसंस्थेलाही विश्रांती मिळते. त्यामुळे अन्न पचवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. डॉ. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १८ तास उपवास केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच श्रावणातील दमट वातावरणामुळे मंदावलेली पचनक्रिया सुधारण्यास, कफ आणि पित्त दोष संतुलित ठेवण्यास तसेच शरीरातील जडपणा आणि सुस्ती कमी करण्यासही उपवास उपयुक्त ठरू शकतो. पचनसंस्थेला विश्रांती मिळाल्याने शरीरातील ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाते आणि मानसिक स्पष्टताही वाढते, असे त्यांनी सांगितले.
आयुर्वेदातील चरक संहितेमध्येही उपवासाच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये दिवसातून एकदाच भोजन केल्याने आरोग्य आणि आनंद टिकून राहतो, असा उल्लेख करण्यात आला आहे. आयुर्वेदानुसार उपवासामुळे त्वचेवरही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळल्याने तसेच द्रव आहार घेतल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे मुरुमे आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होण्यास सहाय्य मिळू शकते.
याशिवाय उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र मधुमेह असलेल्या आणि रक्तातील साखर नियंत्रणात नसलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. हृदयाच्या आरोग्यासाठीही उपवास फायदेशीर ठरू शकतो. उपवासामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास, रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच शरीर हलके वाटल्याने मानसिक ताण कमी होतो, मन शांत राहते आणि ध्यान व एकाग्रता वाढण्यासही उपवास उपयुक्त ठरतो, असे डॉ. चंचल शर्मा यांनी सांगितले.
अस्वीकरण: (या लेखात सुचवलेल्या सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. कोणताही फिटनेस कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, आहारात बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजारासाठी उपाययोजना करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरुण भारत कोणत्याही दाव्यांच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)