अनिल कांबळे
नागपूर,
septic tank in omkareshwar मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र ओमकारेश्वर येथे उघड्या सेप्टिक टँकमध्ये (मैला टाकी) पडल्याने नागपुरातील एका तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली असून निष्काळजीपणाबद्दल एका स्थानिक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तनुष उसराठे असे मृत बालकाचे नाव असून तो नागपूर येथील रहिवासी होता.
प्राप्त माहितीनुसार, २४ जुलै रोजी उसराठे कुटुंब ओमकारेश्वरला गेले होते. त्याचे कुटुंब ओमकारेश्वर ज्योतिलिंर्गाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. ब्रह्मपुरी पार्किंग परिसरात बसमधून उतरल्यानंतर हा चिमुकला अंधारात पुढे धावला आणि जवळच असलेल्या एका उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडला.
मुलाच्या वडिलांनी तातडीने टाकीत उतरून त्याला बाहेर काढले, परंतु फुफ्फुसात दूषित पाणी गेल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीनंतर, नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाने ओमकारेश्वर नगरपरिषदेत कार्यरत असलेले उपअभियंता सुरेशचंद्र पाटीदार यांना निलंबित केले आहे. हा उघडा सेप्टिक टँक एका धर्मशाळेचा होता. नगरपालिकेने अलीकडेच या धर्मशाळेच्या परिसरातील अतिक्रमणे हटवली होती, परंतु हा सेप्टिक टँक उघडाच सोडला ज्यामुळे हा प्राणघातक अपघात घडला.