अर्जुनी मोरगाव,
rajkumar-badole : अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांच्या हिताचा विचार करून आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येणार्या धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई येथे भेट घेऊन केली. यासंदर्भातील सविस्तर पत्रही त्यांनी यावेळी दिले.

आ. बडोले यांनी दिलेल्या पत्रानुसार मतदारसंघातील मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी आपला धान पीक आदिवासी विकास महामंडळामार्फत विक्री करतात. मात्र, सध्या धान खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेमुळे अनेक शेतकर्यांना त्यांच्या संपूर्ण उत्पादनाची शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करता येत नाही. परिणामी उर्वरित धान कमी दराने विकण्याची वेळ येत असून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर धान उत्पादक आदिवासी शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदीची मर्यादा तातडीने वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर धान खरेदी प्रक्रियेत कोणत्याही पात्र शेतकर्याला मर्यादेमुळे वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंतीही पत्राद्वारे केली. यावेळी आ. बडोले यांनी मतदारसंघातील धान उत्पादक आदिवासी शेतकर्यांच्या अडचणी सविस्तर मांडत शेतकर्यांना उत्पादनाला शासकीय हमीभाव मिळावा आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.