मुंबई,
Usha Mangeshkar pays tribute to Asha Tai भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वासह मंगेशकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नुकतेच आशा भोसले यांच्या संगीत कारकिर्दीवर आधारित 'देशोदेशी पानोपानी आशा आशा' या 'स्वरप्रतिभा' विशेषांकाचे प्रकाशन उषा मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले. या विशेषांकाचे संपादन प्रवीण वाळिंबे यांनी केले आहे.या प्रकाशन सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, कामगार नेते सुनील शिंदे आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची उपस्थिती होती. यावेळी उषा मंगेशकर यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि गायन प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले.

उषा मंगेशकर म्हणाल्या की, आशा भोसले यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक संकटांचा धैर्याने सामना केला आणि आपल्या वेगळ्या गायनशैलीमुळे रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. त्यांनी लता मंगेशकर यांच्या योगदानाचाही उल्लेख करत सांगितले की, लता दीदींनी ३५ भाषांमध्ये गाणी गायली, तर आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने संगीतविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली.आशा भोसले यांच्या निधनानंतरही त्या आपल्या गीतांमधून कायम जिवंत असल्याची भावना व्यक्त करत उषा मंगेशकर म्हणाल्या, "आशा ताई आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर आजही जिवंत आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या छायाचित्राला कधीही हार घालत नाही." यावेळी त्यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या आवडत्या गीताचाही उल्लेख केला. "'पांडुरंग कांती' हे आशा ताईंनी गायलेले गीत मला विशेष आवडते. त्यांची अनेक गाणी आजही रसिक तितक्याच आवडीने ऐकतात," असे उषा मंगेशकर यांनी सांगितले.