ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन

वयाच्या ८९व्या वर्षी अखेरचा श्वास

    दिनांक :28-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Veteran journalist Laxmanrao Joshi passes away पत्रकारितेतील ज्येष्ठ, अभ्यासू व निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे मंगळवारी (दि. २८) दुपारी २ वाजता देवनगर येथील सत्यम हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला 'तरुण भारत' या दैनिकात पत्रकार म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले आणि 'तरुण भारत' मध्ये कार्यरत राहिले. पुढे त्यांनी 'लोकशाही वार्ता' या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निर्भीड लेखन आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली.
 

joshi 
त्यांच्या लेखणीने अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडली तसेच नवोदित पत्रकारांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. अन्त्य यात्रा बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता, सहकार नगर, १७९, कुकुराज अपार्टमेंट येथील निवासस्थानावरून निघणार असून सहकार नगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
 
 
 
 
सत्यान्वेषी पत्रकारितेचे पर्व काळाच्या पडद्याआड
‘तरुण भारत‘ या दैनिकाचे माजी मुख्य संपादक आदरणीय श्री लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाने सत्यान्वेषी आणि व्यासंगी पत्रकारितेचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दिवंगत लक्ष्मणराव पत्रकारितेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे कार्य केले. पत्रकार कधी निवृत्त होत नाही, असे ते नेहमी म्हणायचे. त्यामुळे अलीकडचा काही काळ सोडला तर ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. शांत आणि संयमी स्वभावाच्या या ज्येष्ठ संपादकाने पत्रकारितेतील मूल्यांशी कधी तडजोड केली नाही. त्यांची उणीव नेहमी जाणवत राहील. दिवंगत लक्ष्मणराव जोशी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, ही प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे
महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर- अमरावती जिल्हा
 
 
 
ज्येष्ठ पत्रकार, तरुण भारतचे संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाची बातमी मनाला अत्यंत वेदना देणारी आहे. लक्ष्मणरावांशी माझे केवळ औपचारिक नव्हे, तर अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नाते होते. त्यांचे प्रेम, माया, वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि प्रसंगी हक्काने कान पकडत केलेले संस्कार आजही माझ्या स्मरणात कायम आहेत. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दिलेली प्रेरणा आणि दिशा ही माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या जाण्याने मी एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला, प्रेमळ वडिलधाऱ्या व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहे. ही माझ्यासाठी वैयक्तिक हानी तर आहेच, पण पत्रकारिता क्षेत्रासाठीही ती कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती!
– संदीप जोशी
माजी आमदार तथा माजी महापौर