अनिल कांबळे,
नागपूर,
crime-news : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात सोमवारी सकाळी जुन्या वादातून एका भाडेकरूने घरात घुसून तलवार आणि चाकूने तिघांवर प्राणघातक हल्ला केला. या थरारक घटनेत घरमालकाच्या मेव्हणीचा जागीच मृत्यू झाला, तर घरमालक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. संगीता राजू चौधरी (४०) असे मृत महिलेचे नाव असून धर्मपाल सुदाम डहाट (५१) आणि वनीता दहाट (४५) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन नीलकंठ तराळ (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा नरखेड तालुक्यातील मोवाड येथील रहिवासी आहे. सध्या तो एमआयडीसीतील राजीवनगर येथे राहत होता. सुमारे वर्षभरापूर्वी तो धर्मपाल सुदाम डहाट (५१) यांच्या अमरनगर येथील घरात काही महिने भाडेकरू म्हणून राहत होता. भाड्याने राहत असताना मोठ्या आवाजात रेडिओ लावणे, महिलांशी गैरवर्तणूक आणि इतर कारणांवरून घरमालक त्याला वारंवार समज देत होते. त्याचाच राग मनात धरून आरोपीने सूड उगविण्याचा कट रचला. सोमवारी सकाळी रोशन हा तलवार आणि चाकू घेऊन धर्मपाल डहाट यांच्या घरी आला. घराच्या हॉलमध्ये बसलेल्या धर्मपाल यांच्यावर आरोपीने थेट तलवारीने वार केला. बचावासाठी हात पुढे केल्याने त्यांच्या हाताच्या बोटे कापल्या गेली.
पतीचा आवाज ऐकून पत्नी वनिता मदतीसाठी धावल्या. मात्र आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. दोघेही कसाबसा जीव वाचवत घराबाहेर पडण्यात यशस्वी झाले. दरम्यान, घरात पाहुण्या म्हणून आलेल्या धर्मपाल यांच्या मेव्हणी संगीता राजू चौधरी या स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. आरोपीने त्यांच्यावरही तलवारीने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या संगीता या घराबाहेर येताच रस्त्यावर कोसळल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपीने बाहेर जमलेल्या नागरिकांना धमकावले आणि पुन्हा घरात शिरला. परिसरातील युवकांनी तत्परता दाखवत बाहेरून दरवाजा बंद केला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून जखमी धर्मपाल आणि वनिता डहाट यांच्यावर वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.