युक्रेनच्या युद्धाच्या विळख्यात १३ भारतीय!

मदतीसाठी सरकारला आर्त हाक

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मॉस्को,
13 Indians grip of Ukraine war रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील चोर्नोमोर्स्क बंदरात अडकलेल्या मालवाहू जहाजावरील १३ भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय)ने दावा केला आहे की, एमव्ही अमीर१ हे मालवाहू जहाज सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या छायेत अडकले असून, जहाजावरील भारतीय खलाशांनी सुरक्षित सुटकेसाठी केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे. एफएसयूआयच्या माहितीनुसार, एमव्ही अमीर१ या जहाजावर एकूण १५ कर्मचारी असून त्यापैकी १३ जण भारतीय आहेत. संघर्षग्रस्त भागात जहाज अडकल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून, प्रत्येक क्षणी हल्ला होण्याची भीती त्यांना सतावत आहे.
 
 
 
news
 
या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करण्यासाठी एफएसयूआयने जहाजावरील एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये बंदर परिसरात दाट धुराचे लोट दिसत असून, परिसरातील भीषण परिस्थिती स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारतीय खलाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची मागणी संघटनेने केली आहे.युक्रेनच्या दक्षिण किनारपट्टीवर व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असतानाच ही घटना घडली आहे. याआधी ओडेसाजवळ एमव्ही ओमोर्फी या जहाजावर झालेल्या हल्ल्यात चार भारतीय कर्मचारी होते. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने युक्रेनच्या राजदूतांना बोलावून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध करत अशा कारवाया सागरी सुरक्षा, आंतरराष्ट्रीय नौवहन आणि जागतिक व्यापारासाठी गंभीर धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. संघर्ष सुरू असला तरी नागरी व्यापारी जहाजांना लक्ष्य करू नये, अशी मागणीही भारताने केली आहे. यापूर्वी ओडेसाजवळ एमव्ही एजीएन रॅग्नार या जहाजावर झालेल्या हल्ल्यात चार भारतीय खलाशी होते. त्यापैकी दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, तर उर्वरित दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला एमव्ही गोल्डन लिओ या जहाजावर झालेल्या हल्ल्यात चार भारतीयांसह एकूण १० खलाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारत सरकारने रशियाच्या प्रभारी राजदूतांना पाचारण करून संघर्ष क्षेत्रात कार्यरत भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती.