नवी दिल्ली,
A look at India's medals राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम असून आतापर्यंत देशाने दोन सुवर्णपदकांसह एकूण १२ पदके जिंकली आहेत. आता २९ जुलै रोजी होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदकांची कमाई वाढवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. विशेषतः लांब उडीपटू मुरली श्रीशंकर आणि महिला ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धावणारी पारुल चौधरी यांच्याकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. भारतासाठी बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग हे सर्वाधिक आशादायी प्रकार ठरले असून आज बॉक्सिंगमध्ये एकाच दिवशी सहा पदकांची संधी आहे. साक्षी चौधरी, जस्मिन लँबोरिया, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच, अंकुश यादव आणि नरिंदर बरवाल हे उपांत्यपूर्व फेरीत उतरतील. या फेरीत विजय मिळविल्यास त्यांना किमान कांस्यपदक निश्चित होणार आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये संजना महिला ७७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पदकासाठी प्रयत्न करणार आहे. जलतरणात साजन प्रकाश आणि अनिश एस. गौडा हे पुरुषांच्या २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सहभागी होतील. पात्र ठरल्यास ते अंतिम फेरीतही उतरतील. पॅरा जलतरणात सुयश नारायण जाधव आणि चैतन्य विश्वास कुलकर्णी हे पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल एस७ प्रकारात आव्हान सादर करतील.ॲथलेटिक्समध्ये तेजिंदर पाल सिंग तूर, समरदीप सिंग गिल, अनिमेश कुजूर, लोकेश सत्यनाथन, यशस पलक्षा, संतोष कुमार तामिलारसन आणि मनप्रीत कौर यांच्यावरही लक्ष असेल. पॅरा ॲथलेटिक्समध्ये देवेंद्र कुमार, सागर थायत, मोहम्मद बासिल एम आणि दिलीप महादू गवीत हे पदकासाठी मैदानात उतरणार आहेत. याशिवाय लॉन बाऊल्समध्ये दिनेश कुमार, नवनीत सिंग आणि नयनमोनी सैकिया यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. रात्री उशिरा होणाऱ्या अंतिम फेऱ्यांमध्ये मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी, मनप्रीत कौर आणि आर्यन नेहरा यांच्या कामगिरीकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले असून, आज भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.