नवी दिल्ली,
Air India crash probe to continue अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ दुर्घटनेच्या तपासाबाबत विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. १२ जून २०२५ रोजी झालेल्या या भीषण अपघाताचा अंतिम तपास ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे एएआयबीने न्यायालयाला सांगितले. या माहितीनंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.एएआयबीने न्यायालयात स्पष्ट केले की, हा तपास केवळ नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांकडून केला जात नसून, आंतरराष्ट्रीय विमान अपघात तपास नियमांनुसार विविध देशांतील तज्ज्ञ आणि मान्यताप्राप्त प्रतिनिधीही तपास प्रक्रियेत सहभागी आहेत. या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाल्याने तपास अत्यंत व्यापक स्वरूपात सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले.

ही माहिती मृत वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या वडिलांनी आणि फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान देण्यात आली. या याचिकेत अपघाताची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी तपासाला होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केले.यावर एएआयबीतर्फे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, तपास 'विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम' तसेच भारताने स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय करारांनुसार सुरू आहे. ज्या देशांच्या नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला, त्या देशांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञही तपासात सहभागी असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
अंतिम तपास अहवाल ऑक्टोबरमध्ये सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे एआय-१७१ हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले होते. विमान विमानतळालगतच्या एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर आदळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील २४२ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी २४१ जणांचा, तसेच वसतिगृहातील १९ जणांचा मृत्यू झाला होता.