स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
public-service-week : माजी उपमुख्यमंत्री तथा जनतेच्या मनातील लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुसद येथे 22 ते 26 जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, धार्मिक सेवा आणि संघटनात्मक बळकटी या पाचही क्षेत्रांना स्पर्श करणारे उपक्रम राबविण्यात आले. जनसेवा सप्ताहाची सुरुवात 22 जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय सभा घेऊन प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अग्रवाल मंगल कार्यालयात पुसदच्या नागरिकांसाठी मोफत रोगनिदान, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
 
 
 
y29July-Janseva
 
 
 
नगर परिषद क्षेत्रातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राष्ट्रप्रेम आणि संस्कारांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे वितरण करण्यात आले. श्रीरामपूर परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना घरगुती व शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. त्यानंतर पुसद येथील पीएन कॉलेजमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
 
 
एनसीसी कॅडेट्सच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेला श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महाविद्यालय परिसराची पाहणी करून प्राध्यापक व कर्मचाèयांशी संवाद साधण्यात आला. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून प्रत्येक वृक्षाचे संगोपन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला.
याच दिवशी पुसद शहरातील बंजारा कॉलनी येथील संत सेवालाल सांस्कृतिक भवन परिसरात ‘एक वृक्ष : एक संकल्प’ अंतर्गत आणखी एक वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत नागरिकांना अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रेरित करण्यात आले.
 
 
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर औचित्य साधून पुसद बसस्थानक परिसरात श्रीश्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तसेच प्रवाशांना फराळाचे वाटप करण्यात आले. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत हजारो भाविकांना फराळ वितरण करण्यात आले. जनसेवा सप्ताहाचा समारोप नाईक बंगला येथे भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने झाला. उमरखेड व पुसद तालुक्यातील विविध गावांतील अनेक नागरिकांनी राकाँ पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेवर आणि नाईक परिवाराच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला.