वॉशिंग्टन,
Amritpal Singh on FBI's list अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) भारतीय नागरिक अमृतपाल सिंग याचा 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या नेटवर्कमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, तो रवींद्र धांडा ऑर्गनाइज्ड क्राइम ग्रुपचा सदस्य असल्याचा दावा एफबीआयने केला आहे. एफबीआयच्या तपासानुसार, कॅनडातील व्हँकुव्हरमधून कार्यरत असलेला रवींद्र धांडा ऑर्गनाइज्ड क्राइम ग्रुप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा आरोप आहे. या नेटवर्कद्वारे कोकेन आणि मेथाम्फेटामाइनच्या तस्करीच्या कटात अमृतपाल सिंग सहभागी असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात लॉस एंजेलिसमधील फेडरल न्यायालयाने २३ जून २०२६ रोजी अमृतपाल सिंगविरुद्ध फेडरल अटक वॉरंट जारी केले होते. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा जन्म ७ जानेवारी १९९६ रोजी झाला असून तो भारतीय नागरिक आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी २०२४ मधील त्याचा छायाचित्रही सार्वजनिक करण्यात आला आहे.एफबीआयने नागरिकांना आवाहन केले आहे की, अमृतपाल सिंगबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने तपास यंत्रणेला द्यावी. या प्रकरणाचा तपास एफबीआयचे लॉस एंजेलिस क्षेत्रीय कार्यालय करत आहे.यापूर्वीही एफबीआयने जगू भगवानपुरिया टोळीशी संबंधित नितीश कौशल याचा 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समावेश केला होता. अमेरिकेत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा तो सक्रिय सदस्य असल्याचा आरोप त्याच्यावरही करण्यात आला आहे.