उमेश कोल्हे हत्या प्रकरणासाठी विधिज्ञांची नियुक्ती

वकीलपत्र एनआयए कोर्ट मध्ये दाखल

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
umesh-kolhe-murder-case : अमरावती येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याप्रकरणी आज मुंबई येथील एनआयए स्पेशल सेशन्स कोर्टात फिर्यादी तसेच पीडित उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अधिकृत वकीलपत्र दाखल करण्यात आले.
 
 
JL
 
 
 
या प्रकरणात फिर्यादी व पीडित कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ॲड. प्रकाश साळसिंगीकर, ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. खेताराम सोळंकी, ॲड. संकेत राव, ॲड. तेजस सावंत आणि ॲड. श्रीराम चिंदरकर यांनी न्यायालयात हजेरी लावून वकीलपत्र दाखल केले आहे. यापुढील सर्व न्यायालयीन कामकाज, युक्तिवाद व कायदेशीर प्रक्रिया वरील विधिज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
 
 
२१ जून २०२२ रोजी अमरावती येथे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण दहशतवादी कटाशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला असून, पुढे या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थाकडे वर्ग करण्यात आला. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टच्या पार्श्वभूमीवर हा कट रचण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात अनेक आरोपींविरुद्ध विविध गंभीर कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
 
 
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, फिर्यादी पक्षाकडून न्यायालयासमोर प्रभावीपणे बाजू मांडण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील सर्व न्यायालयीन कार्यवाही व फिर्यादी पक्षाची बाजू आता वरील अधिवक्त्यांच्या वतीने मांडण्यात येणार आहे.