मुंबई
assam floods आसाममध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठे संकट निर्माण झाले असून, राज्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे ६८ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख २४ हजारांहून अधिक नागरिक संकटात सापडले आहेत. तर ७६३ गावे पाण्याखाली गेली आहेत. या आपत्तीच्या काळात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
सलमान खानच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी सलमानने आसाममधील आपल्या एका फॅन क्लबसोबत हातमिळवणी केली आहे. ही मदत त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ (Being Human) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे.या मदत मोहिमेची सुरुवात पूरग्रस्तांना बिस्किटे, गूळ, मुरमुरे आणि ब्रेड यांसारख्या तातडीने खाता येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या वाटपाने करण्यात आली आहे. याशिवाय गरजू महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचेही वितरण करण्यात येत आहे.सलमान खानने यापूर्वीही अनेकदा गरजू आणि संकटग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘बीइंग ह्युमन’च्या माध्यमातून त्याने विविध प्रसंगी मदतकार्य केले आहे. गेल्या वर्षी पंजाबमधील काही भागांत मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अनेकांची घरे आणि पिकांचे नुकसान झाले होते, त्यावेळीही सलमान खान मदतीसाठी पुढे आला होता.दरम्यान, आसाममधील पूरग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि संस्था पुढे येत आहेत. २५ जुलै रोजी आसामी गायक पापन यांनी विशाल ददलानी, दिव्या कुमार आणि निलोत्पल बोरा यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर ‘लाइव्ह चॅरिटी कॉन्सर्ट’चे आयोजन केले होते. या माध्यमातून त्यांनी सुरू असलेल्या मदतकार्यासाठी नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन केले.
पुरामुळे राज्यातील सुमारे ७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाल्याचे सांगितले जात असून, बचाव आणि पुनर्वसनाच्या कामांसाठी अनेक सेलिब्रिटी तसेच मानवतावादी संस्था एकत्र येत आहेत. संकटाच्या या काळात मदतीचे अनेक हात पुढे येत असल्याने पूरग्रस्तांना मोठा आधार मिळत आहे.