कुलगाममध्ये हल्ल्याचा कट उधळला! शस्त्रसाठा जप्त

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
श्रीनगर,
Attack plot foiled in Kulgam दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी संयुक्त कारवाई करत संभाव्य दहशतवादी कट उधळून लावला. तांत्रेपोरा–सुरसानू येथील जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, या शस्त्रसाठ्यामागील दहशतवादी नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तांत्रेपोरा–सुरसानू परिसरातील जंगलात संशयास्पद साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी तातडीने संयुक्त शोधमोहीमेची आखणी केली.
 
 
 
kashmir
 
या मोहिमेत कुलगाम पोलीस, भारतीय लष्कराची ३४ राष्ट्रीय रायफल्स (३४ आरआर) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८ व्या बटालियनने सहभाग घेतला. बुधवारी सकाळी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून सखोल तपासणी सुरू केली. घनदाट झाडी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली, मात्र अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर जवानांना लपवून ठेवलेला शस्त्रसाठा सापडला. कारवाईदरम्यान दोन रायफल, दोन पिस्तूल, सात हँड ग्रेनेड तसेच इतर दारूगोळा जप्त करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, येत्या काळात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी हा शस्त्रसाठा तेथे लपवण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त करण्यात आलेली सर्व शस्त्रे सुरक्षा दलांनी ताब्यात घेतली असून, हा साठा कोणत्या दहशतवादी संघटनेचा आहे, तो तेथे कोणी आणि कधी लपवला, याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.