गांधीनगर,
Chandipura virus shakes Gujarat गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा संसर्ग चिंताजनक वेगाने वाढत असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यभरात १५० संशयित रुग्ण आढळले असून त्यांच्या नमुन्यांची गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (GBRC) येथे तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक नीलम पटेल यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान आतापर्यंत २६ रुग्णांमध्ये चांदीपुरा विषाणूची लागण निश्चित झाली आहे. यापैकी तीन रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या संसर्गामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये उपचारासाठी गुजरातमध्ये दाखल झालेल्या राजस्थानमधील तीन रुग्णांचाही समावेश आहे. आणखी नऊ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असल्याने आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चांदीपुरा विषाणूचा प्रसार मुख्यतः संक्रमित वाळूमाशीच्या चाव्यामुळे होतो. काही संशोधनांमध्ये डास आणि गोचीड हेही या विषाणूचे वाहक असू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात कीटकांची संख्या वाढल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढतो. मात्र, हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खोकला, शिंक किंवा स्पर्शाद्वारे पसरत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.या संसर्गाची लक्षणे अतिशय वेगाने दिसून येतात आणि काही रुग्णांची प्रकृती अवघ्या २४ तासांत गंभीर होऊ शकते. अचानक तीव्र ताप, सतत डोकेदुखी, उलट्या, अंगदुखी, झटके येणे, बेशुद्ध होणे, मानसिक गोंधळ तसेच मुलांमध्ये असामान्य सुस्ती ही प्रमुख लक्षणे मानली जात आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास विलंब न करता तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून, वेळेत उपचार हाच या विषाणूपासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले आहे.