वाशीम,
construction workers blocked महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्यात येणार्या भांडे संचाचे वाटप गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याच्या निषेधार्थ आज, २९ जुलै रोजी तर्हाळा (ता. मंगरुळनाथ) येथे बांधकाम कामगार व महिला लाभार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रलंबित भांडे संचाचे तातडीने वाटप करण्यात यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते गजानन आसरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

भांडे संचासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने आंदोलकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित कार्यालय तसेच प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयालाही निवेदन देऊन भांडे संचाचे तातडीने वितरण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. आश्वासन नको, भांडे संचाचे प्रत्यक्ष वाटप करा, अशी मागणी करत .आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पात्र व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या कल्याणकारी योजनेचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
भांडे संचाचे वितरण तातडीने सुरू न झाल्यास आगामी काळात वाशीम जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. आजच्या रास्ता रोको आंदोलनानंतर प्रशासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेते आणि रखडलेल्या भांडे संचाच्या वितरणाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होते, याकडे जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे लक्ष लागले आहे.