अनिल कांबळे,
नागपूर,
cybercriminals : विविध राज्यांमध्ये नोंद झालेल्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीतील रक्कम नागपुरातील चार बँक खात्यांमधून स्वीकारून पुढे वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी चार बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या चार खात्यांमधून सुमारे ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांची संशयास्पद रक्कम व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चारही खाती बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदिरा गांधी कॉलनी, जरीपटका शाखेत आहेत. ही खाती सारिका निलेश कावरे, ऐश्वर्या मनोज सूर्यवंशी, निरंजन के. दांडशी आणि शेख सलीम शेख शाकीर यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. जरीपटका पोलिसांनी सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारींच्या तपासादरम्यान को-ऑर्डिनेशन पोर्टल आणि नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टल वरील माहितीचे विश्लेषण केले. त्यावेळी या चारही बँक खात्यांचा संबंध देशातील विविध राज्यांमध्ये नोंदविण्यात आलेल्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींशी असल्याचे निदर्शनास आले. तपासात संबंधित खातेधारकांनी स्वतःच्या नावाने बँक खाती उघडल्यानंतर ती खाती कथितपणे सायबर गुन्हेगारांना वापरण्यास दिल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा करण्यात आली आणि त्यानंतर ती अन्य बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यामुळे या खातेधारकांनी सायबर गुन्हेगारांना आर्थिक व्यवहारांसाठी आपल्या खात्यांचा वापर करू दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यातील हवालदार सूर्यकांत चांभारे (४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, या खात्यांचा वापर करणाऱ्या व्यक्ती तसेच फसवणुकीच्या रकमेची विल्हेवाट कशी लावण्यात आली, याचा तपास पोलिस करीत आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये बँक खाते भाड्याने देणे किंवा इतर व्यक्तींना खात्याचा वापर करू देणे खातेधारकांसाठीही कायदेशीर अडचणीचे ठरू शकते. या प्रकरणातून अशा प्रकारे बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे