नागपूर,
destruction of new road for pipeline अमृत योजनेअंतर्गत नागपूर शहरात मलनिसारण व इतर पाईपलाईन टाकण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, या कामांच्या नियोजनाअभावी नुकतेच तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते पुन्हा फोडले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. दक्षिण नागपूरातील मानेवाडा परिसरातील सिद्धार्थ नगर आणि श्रीहरी नगर क्रमांक १ येथील विद्याभूषण शाळेजवळ अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता मलनिसारण पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला आहे. या ठिकाणी सुमारे तीन ते चार फूट खोल खंदक खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

नियमांनुसार पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने अथवा कंपनीने रस्ता पूर्ववत दर्जेदार सिमेंट काँक्रीटने बांधणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी केवळ वरवरची डागडुजी करून खड्डे बुजवले जात आहेत, तर काही ठिकाणी रस्ते उघडेच सोडण्यात आले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून जनतेच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची नासाडी होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मानेवाड्यासह दक्षिण नागपूरातील अनेक भागांमध्येही अलीकडेच तयार करण्यात आलेले सिमेंट रस्ते पाईपलाईनच्या कामासाठी वारंवार फोडले जात असल्याने संबंधित यंत्रणांच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व फोडलेले रस्ते तातडीने आणि मूळ दर्जानुसार सिमेंट काँक्रीटने पूर्ववत करण्यात यावेत. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिद्धार्थ नगर व श्रीहरी नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सौजन्य: डॉ. सोहन चावरे, संपर्क मित्र