देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचे निधन

वडिलांनी अखेरचा श्वास घेतलेल्या लंडनमधील त्याच रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मुंबई
sunil anand हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिवंगत अभिनेते देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद (७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विशेष म्हणजे, लंडनमधील ज्या रुग्णालयात देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला होता, त्याच रुग्णालयात सुनील आनंद यांचीही प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती आनंद कुटुंबीयांनी अधिकृत पत्रकाद्वारे दिली असून या दुःखद प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
 

dev anand son sunil anand passes away after heart attack in london 
कुटुंबीयांनी जारी केलेल्या पत्रकात, “अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की सुनील आनंद यांचे निधन झाले आहे. संपूर्ण आनंद कुटुंब शोकाकुल आहे. या कठीण काळात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या आणि आम्हाला प्रेम व पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या शोकमय परिस्थितीत आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखावा,” अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, सुनील आनंद यांच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
 
 
सुनील आनंद यांनी १९८४ मध्ये देव आनंद sunil anand दिग्दर्शित ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र, वडील देव आनंद यांच्याप्रमाणे त्यांना अभिनय क्षेत्रात अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यानंतर त्यांनी कॅमेऱ्यासमोरची वाट सोडून पडद्यामागे राहून चित्रपटसृष्टीत सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आणि देव आनंद यांच्या प्रतिष्ठित नवकेतन फिल्म्स प्रॉडक्शन कंपनीची जबाबदारी स्वीकारली.दरम्यान, देव आनंद यांचे ३ डिसेंबर २०११ रोजी रात्री १० वाजता लंडनमध्ये निधन झाले होते. योगायोगाने, वडिलांप्रमाणेच सुनील आनंद यांचाही मृत्यू त्याच शहरातील आणि त्याच रुग्णालयात झाल्याने या घटनेला भावनिक किनार लाभली आहे.