बाप सर्वात मोठा सुपरस्टार, पण मुलाचं करिअर अवघ्या 4 सिनेमात संपलं

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मुंबई
sunl anand ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांचे एकुलते एक चिरंजीव आणि अभिनेते सुनील आनंद यांचे निधन झाले आहे. लंडनमधील एका रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या ७०व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील आनंद हे अनेक वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
 

dev anand 
देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. मात्र, वडिलांच्या प्रचंड स्टारडमचा वारसा सुनील आनंद यांना मिळवता आला नाही. अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले, मात्र त्यांचे करिअर फार काळ टिकले नाही.सुनील आनंद हे देव आनंद आणि अभिनेत्री कल्पना कार्तिक यांचे एकमेव अपत्य होते. १९५४ मध्ये देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी सुनील यांचा जन्म झाला. अभिनय क्षेत्रातील मोठ्या नावांच्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे सुनील यांच्यावरही चित्रपटसृष्टीत येण्याचा दबाव होता.मात्र, त्यांनी सुरुवातीला शिक्षणाला प्राधान्य दिले. सुनील आनंद यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून सुनील आनंद यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विशेष म्हणजे, या चित्रपटातून देव आनंद यांनी आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही.यानंतर सुनील आनंद यांनी ‘कार थीफ’, ‘मेरे तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मात्र, चार चित्रपटांनंतर अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द पुढे नेणे कठीण असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.अभिनय सोडल्यानंतर सुनील आनंद यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मास्टर’ या चित्रपटाची निर्मिती करत त्यांनी चित्रपटसृष्टीतील दुसरी इनिंग सुरू केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली.
पुढील काळात ते स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास गेले आणि तेथूनच देव आनंद यांच्या प्रसिद्ध ‘नवकेतन इंटरनॅशनल फिल्म्स’च्या कामकाजावर लक्ष ठेवत होते. कामानिमित्त ते अनेकदा मुंबईत येत असत. सुनील आनंद यांनी काही आंतरराष्ट्रीय आणि हॉलिवूड प्रकल्पांमध्ये अभिनय तसेच दिग्दर्शनही केले होते.देव आनंद यांच्या चित्रपट वारशाशी जोडलेले असले तरी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सुनील आनंद यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका शांत प्रवासाचा अंत झाला आहे.